शेतकरीही आता संपावर जाणार !!!

डॉक्टरांचा संप, अभियंत्यांचा संप, शिक्षकांचा संप, वकिलांचा संप, बँक कर्मचाऱ्यांचा संप, शासकीय कर्मचाऱ्यांचा संप, व्यावसायिकांचा संप; अश्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमांद्वारे दररोज प्रसारित होतात. कारण हे सगळे अन्यायग्रस्त वर्ग आहेत. शासनाने यांना महागाई भत्ता नाही दिला तर संप, ‘७वा वेतन आयोग’ नाही लागू केला तर संप, जनतेचा दबाव वाढला तर संप. म्हणजे बसल्या ठिकाणी शासनाचा मासिक पगार मिळूनही हे ‘कलम’ चालविणारे वर्ग संपावर जातात, काय तर “आमच्यावर सरकार अन्याय करीत आहे”. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनांमुळे सरकारचे फार मोठे नुकसान होते, म्हणून सरकार त्यांचे लाड पुरविते. कार्यालयात सावलीत बसून महिन्यावारी पगार कमाविणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना म्हणूनंच ‘सरकारचे जावई’ म्हटले जाते. परंतु सरकारच्या बापाचे(शेतकऱ्याचे) काय? बाप तर उपाशीच मरतोय ना. म्हणजे जावयांचे लाड पुरवायचे आणि बापावर आत्त्महत्तेची पाळी आणायची, हे कोणत्या देशाच्या संस्कृतीचे लक्षण आहे?
पोराच्या हातात व्यवहार देऊन काय बापाने चूक केली?
मात्र आज इतिहासात पहिल्यांदाच हाच बाप “शेतकरीही आता संपावर जाणार!” ही दै.देशोन्नतीमधील बातमी वाचून खरोखर शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. “शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणारही नाही आणि पिकविणारही नाही”, अशी भुमिका घेत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. शेतकऱ्यांनी येत्या १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाख लाख सलाम!
महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यानेच आता संपावर जाण्याची गरज आहे. तेव्हाच सरकारला आटेदालचे भाव कळतील. सर्व प्रकारची आंदोलने करुनही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. उद्योगपतींना शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा खाऊ घालणाऱ्या सरकारला त्यांची औकात दाखवून देण्याकरिता ‘संप’ हा एकमेव उपाय आहे. तेव्हाच त्यांना कळेल कि, “कास्तकारानं नहीं केला पेरा तं मग काय खासाल धतुरा”.
ज्या दिवशी या ऐतखाऊंना कास्तकारांसमोर भिक मागावी लागेल, तो दिवस शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा दिवस असेल. शेतमाल ना पेरणार ना विकणार, ही भुमिका महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी. आता प्रश्न हा आहे कि, मग पेरणार नाही तर स्वतः काय खाणार?
तर स्वतःपुरते व कुटुंबापुरते धान्य, पालेभाज्या, फळभाज्या शेतकरी पेरु शकतात. मग दुसरा प्रश्न हा आहे की, खिशात पैसा कसा खुळखुळणार?
त्यालाही सोपे उत्तर आहे. शेतकऱ्यांनी चारा लागवड करावी व बाजारात विकावा. शेळीपालन, कुक्कुटपालन करावे. शेळ्या व कोंबड्या तसेच कोंबड्यांची अंडी बाजारात विकावी. शेतमालापेक्षा शेळी व कोंबडीला बाजारात दुप्पट भाव आहे, तसेच शेतीच्या तुलनेत शेळी व कुक्कुटपालनासाठी मेहनतही कमी आहे; फक्त डोक्याचा वापर जास्त आहे. त्यापेक्षा जास्त पैसा कमावण्याची इच्छा असेल तर, स्वतः चिकन व मटण विकावे. दर्जेदार चिकन व मटणाला बाजारात भरपूर मागणी आहे. त्यामुळे त्यात भाव होत नाही. शेतमाल जसा कवडीमोल भावात विकत घेतल्या जातो, तसे मांस विकत घेताना भाव होत नाही.  आणि जास्तंच जर पूण्यात्रीपणा अंगात भरलेला असेल तर, गाई व म्हशी पाळाव्यात. दुग्धव्यवसाय करावा. गावरानी गाईंचे संगोपन करावे. तसेच भरपूर दूध देणाऱ्या म्हशी पाळाव्यात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दूध डेअऱ्या आहेत. त्यामध्ये दूध विकावे. किंवा भेसळ न करता स्वतः घरोघरी दूध पुरविल्यास खूप नफा मिळतो. भरपूर पैसा मिळतो. त्यासाठी जनावरांना भरपूर खाद्य द्यावे. हिरव्यागार चाऱ्याची निर्मिती करावी. झपाट्याने हिरवा चारा निर्माण करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान (उदा. हायड्रोफोनिक) वापरात आणावे. त्याहीपेक्षा ‘मॉडर्न’ पद्धतीने पैसा कमावयाचा असेल तर, शेतातंच फलोत्पादन करुन बाजारात थेट विक्री करावी किंवा त्यावर अधिक प्रक्रिया करुन; रुचकर पदार्थ उदा. टोमॅटो चिप्स, केळी चिप्स, पोटॅटो चिप्स बनवून बाजारात विकावे. अशी अनेक उदाहरणे कमी मेहनतीत जास्तीत जास्त पैसा कमाविण्यासाठी देता येतील. तसेच या हरामखोर, बेशरम, सरकारच्या भरवशावर बसावे लागणार नाही. जेव्हा बाजारात अन्नधान्याचा, भाजीपाल्याचा तुटवडा भासेल; तेव्हाच बेभान सरकारचे भान जाग्यावर आल्याशिवाय राहणार नाही. मग बघा शेतकरी आत्महत्त्या कशा कमी होतात ते. शेतकरी आत्त्महत्या थांबविण्याचा हा एक चांगला मार्ग होय. शेतमालापेक्षा फळे, अंडी, मांस, दूध, वेफर्स, चिवडा इ.ना बाजारात भरपूर मागणी आहे आणि भावसुद्धा दुप्पट तिप्पट आहे. मग कशाला ज्याला मागणी नाही, ते उत्पादन घेण्याचा वेडेपणा करायचा?
जेव्हा शेतकरी शेतमाल बाजारात विकणार नाही, तेव्हाच सरकारच्या दारात  शेतकऱ्यांना नाही; तर शेतकऱ्यांच्या दारात पायाशी लोळण घेत सरकारला यावे लागेल. आणि तेव्हा देशातील व्यावसायिक, शासकीय कर्मचारी, अधिकारी यांना स्वतःसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी आंदोलने करावी लागतील. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याने संपाचे हत्यार उपसावे.
*शेतकरीही संपावर! – बळीराजाचा ऐतिहासिक निर्णय*

सौजन्य : लोकनाथ काळमेघ

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *