गांडुळांचा वापर कंपोस्टिंगसह होऊ शकेल पशुखाद्यामध्ये

गांडुळांच्या साह्याने कचऱ्यातील सार्वजनिक आरोग्यासाठी हानीकारक ठरणाऱ्या जिवाणूंचे प्रमाण कमी राखणे शक्य आहे. त्याचप्रमाणे गांडुळांचा वापर पशुखाद्यामध्ये केल्यास ते सध्याच्या अनेक प्राणीज प्रथिनांना पर्याय ठरू शकत असल्याचे मत कॉनकॉर्डिया विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले.
उत्तर अमेरिकेतील घरगुती कचऱ्यामध्ये सेंद्रिय व विघटनशील पदार्थांचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असून, त्यापासून उत्तम दर्जाचे खत व अन्य उपपदार्थ बनवणे शक्य असूनही ते कचऱ्यामध्ये फेकले जाते. २०२० पर्यंत क्यूबेकसारख्या शहरामध्ये त्यावर बंदी आणण्यात येणार आहे. या टाकाऊ घटकांवर वेगाने प्रक्रिया करण्यासाठी कॉनकॉर्डिया विद्यापीठातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. त्यांनी कंपोस्टिंगची एक पद्धती विकसित केली असून, त्याविषयी वेस्ट मॅनेजमेंट या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

प्रमुख संशोधक लॉयझे हेनॉल्ट इदियर यांनी गांडुळाच्या साह्याने कंपोस्टिंगच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे टाकाऊ घटकातील सार्वजनिक आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या जिवाणूंना अक्षम करण्यातील त्यांचा वाटाही मोजण्यात आला. त्याविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, की औद्योगिक कंपोस्टिंग तंत्रामध्ये उष्णतेच्या साह्याने हानीकारक जिवाणू नष्ट केले जातात. शासकीय नियमावलीनुसार, कंपोस्टचे तापमान ५५ अंश सेल्सिअसपर्यंत तीन दिवस राहिले पाहिजे. या अवस्थेमध्ये गांडुळे जगू शकणार नाहीत. गांडुळांच्या साह्याने कंपोस्टिंग करताना त्यातील हानीकारक जिवाणू नष्ट करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू होते.प्राणीज प्रथिनांना पर्याय – 
कॉनकॉर्डिया विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्रा. व्येस गेलिनास आणि जीवशास्त्राचे प्रा. विन्सेंट मार्टिंन यांच्या सहकार्याने गांडुळांच्या साह्याने कंपोस्टिंगचे इ. कोलाय या जिवाणूवरील परिणामांचा अभ्यास केला. त्यामुळे वेगाने कुजविण्याच्या प्रक्रिया करतानाच अशा हानीकारक जिवाणूंचे प्रमाण कमी राखणेही शक्य असल्याचे दिसून आले. गांडुळे नसलेल्या किंवा निर्जंतुकीकरण केलेल्या टाकाऊ घटकांमध्ये मात्र हे प्रमाण फारच कमी काळ राखणे शक्य होते.
– सरासरी १८ ते २१ दिवसांमध्ये गांडुळांच्या साह्याने कुजविण्याची प्रक्रिया घडते. त्यात इ. कोलाय जिवाणूंचे प्रमाण कायद्याच्या मर्यादेपेक्षा कमी राहत असल्याचे गेलिनास यांनी सांगितले.
– गांडुळे हे टाकाऊ घटकांच्या विघटनामध्ये मोलाची भूमिका निभावतातच, त्याचप्रमाणे पशुखाद्यामध्येही त्याचा वापर करता येतो. सध्याही विविध पशुखाद्यांमध्ये मत्स्य व अन्य प्राणीज घटकांचा वापर केला जातो. त्याला हे पर्याय ठरू शकते.
सौजन्य : Agrowon

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *